चंद्रपूर ( मुक्तिवाद सेवा ) : 22.05.2026 रोजी सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील गुंजेवाही उपक्षेत्र अंतर्गत नियतक्षेत्र गुंजेवाही येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडली. गुंजेवाही येथील महिला तेंदू पाने गोळा करण्यासाठी जंगलात गेल्या असता त्यांच्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना उघडकीस आली. त्यामध्ये कु. कवडाबाई दादाजी मोहुर्ले, वय 45 वर्ष, रा. गुंजेवाही , कु. अनुबाई दादाजी मोहुर्ले, वय 40 वर्ष, ता. गुंजेवाही , सौ. संगीता संतोष चौधरी, वय 50 वर्ष, रा. गुंजेवाही , श्रीमती. सुनिता कौशिक मोहुर्ले, वय 38 वर्ष, रा. गुंजेवाही सदर महिला सकाळी अंदाजे 7.30 वाजताच्या सुमारास गुंजेवाही बिट कक्ष क्र. 1836 पी.एफ. मध्ये तेंदू पाने गोळा करीत असताना घटना घडली. मौका तपासणीअंती सदर चारही महिलांचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झाल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती प्राप्त होताच सौ. अंजली सायंकार, (बोरावार) वनपरिक्षेत्र अधिकारी, सिंदेवाही, पी. एस. मानकर क्षेत्र सहायक गुंजेवाही, अमर गेडाम वनरक्षक गुंजेवाही व अधिनिस्त परिक्षेत्रातील वनकर्मचारी व RRU पथक सिंदेवाही, घटनास्थळी दाखल झाले. सदर घटनेची माहिती विभागीय कार्यालयास तात्काळ दिल्यानंतर कुमारस्वामी एस.आर., उपवनसंरक्षक ब्रम्हपुरी वनविभाग ब्रम्हपुरी, एम. बी. गायकवाड सहायक वनसंरक्षक ब्रम्हपुरी वनविभाग ब्रम्हपुरी, अरविंद जे, सहायक वनसंरक्षक प्रादे. व वन्यजीव ब्रम्हपुरी वनविभाग, ब्रम्हपुरी घटनास्थळी दाखल झाले. तसेच घटनेची माहिती तत्काळ पोलीस विभागास देण्यात आली. त्यानंतर पोलीस स्टेशन सिंदेवाही येथील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे पाठविण्यात आले.
मृतांच्या वारसदारांना तातडीची आर्थिक मदत म्हणून प्रत्येकी रुपये 25,000 /- प्रमाणे एकूण रुपये 1,00,000/- रोखीने देण्यात आले. त्यानुसार कु. कवडाबाई दादाजी मोहुर्ले व कु. अनुबाई दादाजी मोहुर्ले यांचे वारसदार भाऊ रमेश दादाजी मोहुर्ले, रा. गुंजेवाही यांना रुपये 50,000/-, संगीता संतोष चौधरी यांचे वारसदार पती संतोष आडकु चौधरी यांना रुपये 25,000/- तसेच सुनिता कौशिक मोहुर्ले यांचे वारसदार दीर चंद्रकांत सुधाकर मोहुर्ले यांना रुपये 25,000 /- देण्यात आले.
सदरच्या परिसरात वनविभागामार्फत नियमित गस्त सुरू असून तेंदू हंगाम सुरू होण्यापूर्वीपासूनच मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. वनकर्मचा-यांनी तेंदू फडीवर भेट देऊन मजुरांना समूहाने जंगलात जाण्याबाबत मार्गदर्शन केले होते. तसेच प्रत्येक गावामध्ये लाऊडस्पीकरद्वारे सूचना प्रसारित करणे, भिंत्तीपत्रके लावणे व वाघाच्या अस्तित्वाबाबत जनजागृती करणे अशा उपाययोजना सातत्याने राबविण्यात येत आहेत. घटनास्थळ परिसरात वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा ट्रॅप व लाईव्ह कॅमेरे लावण्यात आले असून क्षेत्रीय कर्मचारी व विशेष पथकाद्वारे गस्त वाढविण्यात आलेली आहे. नागरिकांनी जंगल परिसरात जाताना अत्यंत सतर्कता बाळगावी व समूहानेच जंगलात जावे, असे आवाहन वनविभागामार्फत करण्यात येत आहे. अशी माहिती अंजली सायंकार, (बोरावार) वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादे.) परिक्षेत्र सिंदेवाही यांनी दिली आहे.




