muktiwad logo
Home Chandrapur विनाकारण मारहाण केल्याबद्दल ‘ त्या’ पोलिस अधिकार्‍यांवर कारवाई करा – मिलिंद नगराळे...

विनाकारण मारहाण केल्याबद्दल ‘ त्या’ पोलिस अधिकार्‍यांवर कारवाई करा – मिलिंद नगराळे यांची पत्रपरिषदेत मागणी.

0
128

चंद्रपूर ( मुक्तिवाद सेवा ) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्य १४ एप्रिल रोजी निघालेल्या रॅली दरम्यान एका व्यक्तीला फटाके फोडत असल्याचे कारण समोर करुन पोलिसांनी मारहाण केली. त्यानंतर सदर रॅलीत मिलिंद नगराळे व त्यांचा भाऊ निखिल नगराळे यांनी मध्यस्ती करत त्या व्यक्तीला का मारहाण करता म्हणून पोलिस अधिकार्‍यांना विचारणा केली असता पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. तसेच पोलिस स्टेशनमध्ये नेऊन तिघांनाही विनाकारण बेदम मारहाण केली. कोणताही गुन्हा नसतांना मारहाण करणार्‍या बल्लारपूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक इंगळे आणि डिबी पोलिस जंगमवार यांच्या विरोधात मिलिंद नगराळे यांनी पत्रपरिषद घेत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
बल्लारपूर येथे १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून रॅली काढण्यात आली. रॅलीच्या शेवटी सौरभ नावाच्या मुलाने आपल्या काही मित्रासमवेत डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर फटाके फोडण्यास सुरवात केली. यावेळी पोलिसांनी त्या मुलाला ताब्यात घेत मारहाण केली. याच दरम्यान रॅलीत सहभागी असलेले मिलिंद नगराळे यांनी पोलिसांना मारहाण कोणत्या अधिकारात करता अशी विचारणा केली असता पोलिसांनी मिलिंद नगराळे यांनाही मारहाण करण्यास सुरवात केली. भावाला मारहाण करीत असल्याचे निदर्शनास येताच निखिल नगराळे यांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. परंतू पोलिसांनी त्यांनाही मारहाण करीत तिघांनाही १५ एप्रिल रोजी रात्री १२.३० च्या सुमारास पोलिस स्टेशनमध्ये आणून बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. यामुळे तिघेही गंभीर जखमी झाले. त्यानंतर तिघांनाही वैद्यकिय उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले असता कोणताही उपचार न करता पहाटे ५.३० च्या सुमारास सोडून देण्यात आले. तत्पूर्वी त्यांच्यावर दारु पिऊन धिंगाणा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर तब्बल १ महिन्यांनी त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. सध्या ते जामिनावर बाहेर असले तरी त्यांना जो मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला व खोटा गुन्हा दाखल करण्यात आला त्याबाबत २० एप्रिल रोजी त्यांनी पोलिस अधिक्षकांची भेट घेतली व त्यांना सविस्तर माहिती दिली. त्यानंतर ७ मे रोजी नविन रुजु झालेल्या पोलिस अधिक्षकांनाही निवेदन सादर केले. परंतू आजतागायत त्या पोलिसांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे मानसिक व शारिरीक छळ करणार्‍या ‘त्या’ पोलिस अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी मिलिंद नगराळे यांनी पत्रपरिषदेच्या माध्यमातून केली. यावेळी निखिल नगराळे यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here